राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेतर्फे डेक्कन कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद   

पुणे : डेक्कन कॉलेज आणि राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद यांच्या वतीने तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २६ ते २८ एप्रिल या कालावधीत डेक्कन कॉलेजमध्ये होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी आणि परिषदेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
 
या परिषदेच्या चर्चेचा मुख्य विषय ‘भारतीय परिप्रेक्ष्यात सामाजिक विज्ञान’ असा असून, या विषयाच्या अनुषंगाने समाज विज्ञानाच्या इतर विद्याशाखांशी संबंधित भारताच्या विविध भागातून आलेले २०० पेक्षा अधिक संशोधक आपले संशोधन लेख सादर करणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत प्रा. पी.व्ही.के. भट्ट, प्रा. राजकुमार भाटीया उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए.डी.एन. वाजपेयी भूषवणार आहेत. 
 
या तीन दिवस चालणार्‍या सत्रांत भारतीय परिप्रेक्ष्यात संस्कृती, इतिहास, सामाजशास्त्र, भाषाशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांच्या विविध अंगांचा सखोल विचार आणि चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत काही विशेष बीजभाषणे आणि चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. शनिवारी प्रा. वसंत शिंदे, माजी कुलगुरू प्रा. सुरेंद्र सिंग, डॉ. सदानंद मोरे यांची बीजभाषणे होतील. या बीजभाषणांचे संचालन जेएनयुच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित करतील, अशी माहिती डॉ. जोशी आणि पांडे यांनी दिली.

Related Articles